अशी ही चाळ बटाट्याची-नाट्य परीक्षण
लहानपणी आपल्याला एक निबंध लिहायला सांगायचे “ माझा एक सामान्य दिवस..” पुलांनी देखील असाच विचार करून, त्यांच्या पद्धतीने “चाळीचा एक दिवस” या विषयावर एक संगीतिका लिहिली. त्यांच्या निरीक्षण शक्तीमुळे, लेखनसामर्थ्यामुळे हे एक अजरामर असे विनोदी साहित्य घडले. ही मराठीतील पूर्णपणे पद्यात लिहिलेली संगीतिका होती. पुलांनी याचे अनेक एकपात्री प्रयोग केले होते, ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. अगदी आचार्य अत्रे यांनी या संगीतिकावर एक लेख लिहिला आहे.
आता जवळपास 60 वर्षानंतरदेखील या संगीतिकेची जादू अबाधित आहे. नवीन दमाच्या, नवीन पिढीच्या हुनहुन्नरी दिग्दर्शकांना व निर्मात्यांनादेखील यावर काम करावेसे वाटते. यायोगेच, लेखक-दिग्दर्शक योगेश सप्रे आणि दिग्दर्शक-संगीतकार देवेंद्र भोमे यांनी, ही एकपात्री एकांकिका, अनेक पात्रांसकट विस्तृत स्वरूपात रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुलंच्या मूळ संहितेला अबाधित ठेवून, त्यात काही भाग वाढवूनच, अडीच तासांचा हा नाट्यविष्कार रंगमंचावर सादर केला आहे.
पडदा उघडल्याबरोबर जो सेट उभारला आहे, तो कल्पक आहे. संपूर्ण बटाट्याची चाळच इथे उभारली आहे. यात अनेक बिऱ्हाडे, गच्ची, सार्वजनिक नळ, चाळीसमोरचे अंगण याद्वारे चाळीचे विस्तृत असे दर्शन घडते. गच्चीत वाळत टाकलेले कपडे, भिंतीला आलेली ओल, उडालेला रंग, निमुळत्या पायऱ्या वातावरणनिर्मिती करतात. बटाट्याची चाळ पुस्तक वाचताना जशी चाळ डोळ्यासमोर उभी होते, तशीच ती प्रत्यक्षात रंगमंचावर उभारलेली आहे. अशी चाळ रंगमंचावर पाहताना एक प्रकारचे शब्दात व्यक्त न होत करता येणारे समाधान मिळते. रंगमंचावर ठेवलेले खुर्च्या, टेबले, हंड्या, कळश्या ह्या कालानुरूप आहेत. नाटकात कचेरीच्या प्रसंगावेळी केलेले बदल, कचेरीचा अनुभव सहीसही देतात.
ही मूळतः संगीतिका असल्याने, संगीत यात खूपच महत्त्वाचा भाग, याचा गाभाच आहे. यासाठीच यातील बहुतेक कलाकार हे गायक आहेत. याखेरीज वाद्यवृंददेखील त्यांना योग्य ती साथ देतो. वाद्यांमध्ये पेटी, तबला, संबळ, व्हायोलिन यासारख्या पारंपारिक वाद्यांबरोबरच, चेलो, mouth harmonium असे अपारंपारिक वाद्ये रंगमंचावर वापरले आहेत. यातील संगीताबद्दल विशेषपणे सांगावेसे वाटते. पुलंच्या मूळ सुरेल चालींना, आधुनिक रूप देण्याचे शिवधनुष्य संगीतकार देवेंद्र यांनी सशक्तपणे पेलले आहे. याद्वारे संगीतात अधिकची नाट्यमयता आणली आहे . संगीतातील या बदलांमुळे, संगीतकेतील अनेक प्रसंग अजून फुलतात. अनेक पाश्चात्य वाद्यांच्या प्रयोग केल्यामुळे, संगीतात अजून रंग आले आहे. पुलंनी संगीतबद्ध केलेली काही गाणी - माझिया माहेरा जा, कौसल्येचा राम- यात समाविष्ट करून दिग्दर्शकांनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
यात सर्वच पात्रांना गायन अनिवार्यच आहे. त्यामुळेच मूळचे गायक, अभिनय कसे कळतील व मूळचे अभिनेते, गायन कसे करतील, अशी शंका मनात होती. दोन्ही गटांनी गायन व अभिनय हे दोन्ही भाग सशक्तपणे पेलेले आहेत. गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजलीताईंनी अभिनय इतका सुरेख केला आहे की, त्यांची दृष्ट काढावीशी वाटते. पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांचे स्वतंत्र गायनदेखील अभूतपूर्व झाले आहे. संपूर्ण सभागृहाला ते खेळवून ठेवते.
यातील एक प्रमुख पात्र पॅडी ह्यांनी अनेक बहुरंगी साकारल्या आहेत. रामागडीच्या प्रसंगात, रामाचा अडमुठेपणा, बेदरकार वृत्ती दाखवतानाच, प्रसंगाच्या शेवटी मूळभूमीची, कोकणची आठवण, प्रेक्षकांना भावुक बनवते. याच प्रसंगात पंतपत्नी (अंजलीताईं मराठे) यांचा आर्जवी, लाडिक असा अभिनय आणि गायन, पंत (आशुतोष मुंगळे) याची त्यावर प्रतिक्रियादेखील मजेशीर आहे. प्रेमात हरवलेली शांता (शमिका भिडे), तिचा प्रियकर अंतोबा जोशी (अजित परब) याचा व त्यांच्या कचेरीतील सरला पित्रे (तन्वी परांजपे) हा प्रेम त्रिकोणसुद्धा सुंदरपणे रंगवला आहे. समेळकाका (केतन पवार) हा त्याच्या अतरंगी वागण्याने नाटकात वेगळाच रंग भरतो. कवी रंगो विठ्ठल (मिलिंद जोशी) व कवीपत्नी (स्वरांगी मराठे) यांच्यातील कौटुंबिक कलहात हास्याचे फवारे उडतात. नळावरील भांडणावेळी पंतपत्नी, प्रभा (ईशिता साबळे) विरुद्ध खरेकाकू (मधुरा आफळे), कवीपत्नी हा सामना देखील खूप रंगला आहे. चिंगी (साक्षी देशपांडे), पंतांचा मुलगा (वज्रान्ग आफळे) या बालगोपाळ मंडळींनीसुद्धा आपल्या मूकाभिनयामुळे कमाल करतात.
नाटकातील इतर बाबीसुद्धा खूप नीटपणे हाताळल्या गेल्या आहेत. रंगभूषा, वेशभूषा चपखल आहे. नृत्यदिग्दर्शन या विनोदी नाटकात, नृत्याद्वारे,अनेक हास्यप्रसंग निर्माण झाले आहेत. रंगमंचावर एकाच वेळी अनेक पात्रांचा वावर सतत असतो. ही पात्रेदेखील, त्यांच्या प्रसंगांवर अभिनयाने प्रसंगानुरूप प्रसंगानुरूप अभिनयाने हास्य निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया, मूकाभिनय यामुळेही नाटकाची रंगत वाढते.
आता यातल्या काही त्रुटींबद्दल बोलूया. नाटकाच्या वेळी संगीत संयोजनात काही प्रमाणात गडबड झाली होती. काही माईक सुरुवातीला चालू नव्हते. एकूण सुरुवातच थोडी गडबडीतच झाली असे वाटले, काही वेळेस गायनापेक्षा वाद्यवृंदांचा आवाज मोठा असल्यामुळे, काही पदे ही नीट ऐकू येत नव्हती. छायाचित्रकार सतत विंगेतून आत बाहेर करत असल्याने, लक्ष विचलित होत होते. पंतांच्या खोलीला कठडे नसल्याने काही प्रमाणात धोकादायक वाटत होते. ट्राम या पिढीतील कोणीही पाहिली नसल्यामुळे, तिचा आवाज हा कसा असेल, अशी एक उत्सुकता मनात दाटली होती. दिव्यांच्या नियोजनात देखील सुधारणेला वाव आहे. या त्रुटी हळूहळू सुधारता येण्याजोगे आहेत. दिग्दर्शनात व लेखनात फारश्या त्रुटी जाणवत नाहीत.
एकूणच हा एक वेगळा प्रयोग संपूर्ण संचाने खूपच ताकदीने साकारला आहे. महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट साहित्यिकांपैकी असलेल्या एक असलेल्या पुलंच्या या अजरामर कलाकृतीला हात लावणे, एक धाडसाचे काम आहे. त्यांच्या कार्याला, नवी पिढीपर्यंत सुबकतेने नेण्याचे काम, हे नाटक करते. मूळच्या विनोदी असलेल्या या संगीतिकेत भावुक करणारे प्रसंग आणून हे नाटकाला अजून वरच्या पातळीवर नेले आहे. पुलंच्या विनोदालाही कारुण्याची एक लकेर असते. ही त्यांची खासियत या प्रयोगातसुद्धा जाणवते. पुलनी संगीतबद्ध केलेली गाणी यांचा चपखळ वापर केला आहे. मूळ संहितेत, संगीतात काही तांत्रिक बदल केल्याने, ती अधिक आनंददायक व ताजी वाटते. अशा सुंदर नाटकाला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
-बेशब्द..
०२ ऑगस्ट २०२६