कला- मनोगत
माझ्या आयुष्यात मला नेहमीच एक खंत राहिली आहे की, माझ्याकडे कोणतीही कला नाही. लहानपणी मी काढलेल्या चित्रांना माझ्या शिक्षकांनीदेखील नावे ठेवली होती. माझ्या जहाजाच्या चित्राला त्यांनी 'चप्पल' म्हटले होते, तर मी काढलेल्या Distillation Column ला 'अळी' म्हणून संबोधले होते. माझे गायन एवढे बेसूर होते की, मला समूह गायनात गाणे न गाता, फक्त ओठांची हालचाल करायला सांगितले होते. या सर्वांचा मला एवढा न्यूनगंड आला होता की, मी कधीही कोणासमोर गाणे गाणे टाळतो.
जेव्हा मी सातवीत होतो, तेव्हा संगीताच्या 'मध्यमा प्रथम' ही परीक्षा दिली होता. त्या दिवशी घरच्यांना फसवून मी मामाच्या घरी जाण्याचा बेत आखला होता. पण अनपेक्षितपणे माझ्या घरी माझा एक वर्गमित्र आला आणि त्याने परीक्षेबद्दल घरच्यांना सांगितले. त्यामुळे मामाकडे जाण्याचा बेत रद्द झाला आणि मला नाईलाजाने ती परीक्षा द्यावी लागली. परीक्षासुद्धा एवढी वाईट गेली की, शेवटी उत्तीर्ण करण्यासाठी परीक्षकाने मला कोणतेही गाणे म्हणायला सांगितले. तेव्हा मी 'कहो ना प्यार है' हे गाणे म्हटल्याचे मला आठवते. माझ्या अख्ख्या इयत्तेत सर्व मित्रांमध्ये फक्त मलाच (पास करण्यासाठी) असे गाणे गायला सांगितले होते.
या सगळ्यामुळे माझ्यात कोणतीही कला नाही, मी 'अकला-कार' आहे, असे मी गृहीतच धरले होते. अर्थात, कलेविषयी प्रेम असल्याने मी एक वाचक, श्रोता आणि प्रेक्षक या रूपाने कलेशी निगडित राहिलो. 'फिरोदिया करंडक' आणि 'पुरुषोत्तम करंडक' या स्पर्धांसाठी मी आमच्या महाविद्यालयाला मदत केली. तेव्हा मी पडद्यामागची बाजू सांभाळायचो. 'मास्किंग' या तुलनेने दुर्लक्षित कार्यक्षेत्राची जबाबदारी पूर्णपणे माझ्याकडेच होती. यात मी एक नवीन युक्ती लढवून माझे काम सोपे केले होते; मी तिथे 'वेलक्रो'चा (Velcro) वापर करायला लागलो आणि अजूनही त्याच युक्तीचा वापर केला जात आहे. मागच्या आठवड्यातच यासाठी मला माझ्या एका मित्राने दूरध्वनी केला होता, त्यालासुद्धा मी ही क्लुप्ती त्यातल्या तांत्रिक बाजूसकट समजावून सांगितली.
मी अनेकविध पुस्तके वाचली, कित्येक नाटके पाहिली आणि अनेक छोट्या-मोठ्या ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम ऐकले. ए. आर. रहमान यांचा कार्यक्रम मी चार वेळा पाहिला व ऐकला आहे—बालेवाडी (पुणे), मोटेरा क्रीडांगण (अहमदाबाद), नगर रस्ता (पुणे) आणि जिओ वर्ल्ड सेंटर (मुंबई). मी अनेक प्रायोगिक व व्यावसायिक नाटके पाहिली आहेत. मी सुरतमध्ये असताना गुजराती भाषेतील काही नाटकेसुद्धा पाहिली आहेत. तसेच म्हैसूरला ९ तास लांबीचे कन्नड नाटक 'पर्व' सुद्धा पहिले आहे.अशा प्रकारे 'फक्त प्रेक्षक' या भूमिकेतच मी खूप वर्षे घालवली.
एकदा मी मनाशीच कोणतेतरी गाणे गुणगुणत असताना कोणीतरी ते ऐकले आणि मला त्याबद्दल टोकले. माझ्या न्यूनगंडामुळे मी काहीशा बचावात्मक पद्धतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करता होतो. त्यावर मला असे उत्तर मिळाले की, "प्रत्येक आवाज हा सुंदरच असतो!" तेव्हा खरे तर माझे डोळे उघडले. कोणतीही कला ही सर्वमान्य नियमांनीच बांधलेली असते आणि त्या नियमांच्या पलीकडचे सगळे चुकीचे आहे, अशी माझ्या मनाची धारणा होती. या धारणेला छेद देणारा हा तो क्षण होता. कला ही सर्वमान्यच असली पाहिजे असे काही नाही. कला जरी रसिकांसाठी असली, तरी ती त्याहून कितीतरी जास्त प्रमाणात कलाकारासाठी असते. कलाकार हा स्वतःशीच आणि स्वतःसाठीच खरे तर कलेची निर्मिती करत असतो; रसिकाला होणारा त्या कलेचा लाभ हा तर केवळ त्या कलेचा Byproduct असतो. कलाकार कलेद्वारे स्वतःलाच अभिव्यक्त करत असतो. कलाकार सच्चा असेल तर त्याची कलादेखील त्याच्यासाठी उत्तम असतेच पण रसिकसुद्धा त्यातील सच्चेपणा अनुभवतात. कलाकाराने घेतलेल्या कष्टांची परिणिती म्हणजे त्याची कला असते. अर्थात, हे कष्ट ती कला शिकण्यात आणि सुधारण्यात असतात; प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी ते कष्ट नसतातच, तो केवळ आनंदाचा काळ असतो. ज्यामध्ये तो स्थळ-काळाचे बंधन विसरून, स्वतःच्या कलेच्या मस्तीत आणि धुंदीत असतो. तीच त्याची प्रार्थना, त्याची आराधना असते.
कला ही तुमच्या भावनांचे प्रतिबिंबच असते. आजकालच्या जगात आपले लक्ष वेधून घेणारी एवढी साधने असतानाही, आपल्याला आपल्याच भावना कळेनाशा झाल्या आहेत. कलेच्या माध्यमातून काहीही मांडताना, त्या भावनांशी स्वतःला परत जोडता येते आणि मनातील भावनिक गुंता सोडवता येतो. माणसातून भावना वजा केल्या, तर तो केवळ एक यंत्रमानव बनेल. अशा कळपातील मेंढ्या बनण्यापासून आणि यंत्रमानव होण्यापासून फक्त कलाच मानवजातीला वाचवू शकेल.
नित्शेने (Nietzsche) म्हटले आहे की, "कला हीच मानवजातीला तारू शकते." मला वाटते की, प्रत्येक माणसाने स्वतःला स्वतःशीच प्रस्तुत करण्यासाठी आणि जीवनाच्या दैनंदिन रहाटगाडग्यातून बाहेर पडण्यासाठी कलेचा वापर केला पाहिजे. ही कला प्रदर्शनासाठी नसून 'स्व-दर्शनासाठी' असावी. याद्वारे स्वतःला प्रपंचातून मुक्त करून, प्रपंचापलीकडच्या विश्वात रममाण व्हावे. या विश्वात फक्त तो आणि तोच असावा; कसलेही बंधन किंवा अट नसावी, कलेचे जाचक नियम नसावेत. अशा स्थितीत निर्माण झालेली कला ही खरोखरच अलौकिक आणि अनुभवासारखी असते.
-बेशब्द..
२७ जुलै २०२६