कृष्णवेध पुस्तक-परीक्षण
पुस्तकाचे नाव: कृष्णवेध
लेखक: गो नी दांडेकर
वाचन दिनांक: 26 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025
लेख दिनांक: 2 जानेवारी 2026
कृष्णवेध हे गोनिदा यांचे कृष्णाच्या सखेसवंगड्यांवर लिहिलेले पुस्तक आहे. यात राधा, पेंद्या व कुब्जा या, त्या काळातील व्यक्तिरेखांचे रेखाटन त्यांच्या पद्धतीने, गोष्टरूपाने सांगितले आहे. हे बऱ्याच प्रमाणात मूळ कथेनुसार असले, तरी गोनीदांनी त्यांच्या कल्पनेने, या दुय्यमपत्रांचा विस्तार केला आहे. ही तिन्ही पात्रे कृष्णाच्या आयुष्यावर कसा परिणाम घडवतात, हे यात दाखवले आहे.
राधा हे पात्र कृष्णाच्या आईच्या वयाचे आहे. ती यशोदाची जिवाभावाची मैत्रीण होती. कृष्णजन्मापासूनचे तिचे व कृष्णाचे नाते एकमेकांशी असलेले नाते, गोनीदांनी खूपच तपशिलाने मांडले आहे. ती स्वतः निपुत्रिक असली, तरी कृष्णाची तिने एका सख्या आईप्रमाणे काळजी घेतली आहे. त्यांच्यामधील नात्यांचे विविध पदर गोनीदांनी खुबीने दाखवले आहेत. तिचा सासुरवास, तिच्या आयुष्यातील चढउतार दाखवताना, तिचे कृष्णावरील माया, ममता, प्रेम अढळ राहते. निपुत्रिक असल्यामुळे, लोकांचे टोमणे सहन करून सुद्धा, ती कृष्णासाठी सर्वकाही करते. हे सर्व ललित साहित्यात लिहिले असल्याने व अनेक उपकथा जोडल्या असल्याने मनोरंजक ठरते. एका आईची ममता, तिचा त्याग, कृष्ण संकटात असताना तिची होणारी घालमेल, खूपच उत्कृष्टपणे दाखवली आहे. एवढे सगळे असतानाही जेव्हा कृष्णाला घ्यायला अक्रूर येतो, तेव्हा ती सहजपणे परवानगी देते. तेव्हा ती पूर्णपणे कृष्णमय झालेली असते. त्यामुळे तिला कृष्णाबद्दल चिंता न वाटता, पूर्ण आत्मविश्वास असतो की, कृष्ण हा सर्व अडीअडचणीतून, युद्धातून विजय होऊन परत येईल. अर्थात त्यानंतर कृष्ण तिला परत कधीच भेटत नाही, पण तीसुद्धा त्याच्या भेटीची आस ठेवत नाही. ती पूर्णपणे कृष्णमय होते. त्याद्वारे तिची कशी भौतिक जगातून मुक्तता होते, हेही या दर्शविले आहे.
दुसरे पात्र पेंद्या म्हणजे प्रज्ञावान. हा एका वृद्ध ब्राह्मण जोडप्याचा पुत्र, ज्याला ते गोकुळी सोडून निजधामास जातात. हा पायाने अधू असूनसुद्धा सर्वांचे कामे करतो व त्यामुळे त्याला गोकुळात आश्रय मिळतो. जात्याच हुशार व कामसू असल्याने गावातील अनेक कामे तो करत असतो. त्याचबरोबर, इतरांना, अगदी मोठ्यांनादेखील सल्ले देत असतो. तो स्वतःला कृष्णाचा गुरु सांगता सांगता स्वतःच कृष्णमय होतो. कृष्ण मथुरेला जातो, तेव्हा हा गावात नसतो. तेव्हा कृष्णाने जाण्याआधी माझी परवानगी घेतली नाही म्हणून तो खूप चिडतो. नंतर जेव्हा कृष्णाचा अमात्य, उद्धव येऊन त्याला कृष्णाचे त्याच्यावरच्या प्रेमाबद्दल सांगतो, तेव्हा तो पूर्णपणे बदलून कृष्णमय होतो. त्याच धुंदीत प्रज्ञावान निजधामास जातो. पेंद्या हे पात्र सहसा हास्य करमणुकीसाठीकरून योजलेले आहे, असे मला आत्तापर्यंत वाटत होते. पण इथे गोनीदांनी त्याचा प्रज्ञावान करून, ते त्याच्याबद्दल एक वेगळीच दृष्टी देतात. त्याच्या मित्रप्रेमाला एक वेगळीच उंची प्रदान करतात. कृष्णाच्या सानिध्यात राहून पेंद्यादेखील कसा कृष्णमय होतो, स्वत्व विसरून, समाजाला विसरून तो कसा कृष्णभक्तीत समर्पित होतो, हे खूपच चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कृष्णाने गोकुळातून जाताना परवानगी न घेतल्यामुळे चिडलेला पेंद्या व नंतर उद्धवद्वारे त्याला त्याचे उत्तर मिळाल्यावर, कृष्णामध्ये विरघळून जाणारा पेंड्या, ही दोन्ही व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर उभे करताना गोनिदांना पूर्ण यश आले आहे.
यातील तिसरे व मला सर्वात जास्त स्पर्श झालेले पात्र म्हणजे कालिंदी उर्फ कुबजा. हे पात्र अत्यंत विद्रूप आहे. तिचे शरीर तीन ठिकाणी वाकडे होते. ही उग्रसेन राजाची दासीपुत्री असून, या प्रकरणाच्या सुरुवातीलाच कंस, तिच्यासमोरच तिच्या आईचा वध करतो. नंतर हिला केवळ चंदन उगाळवायच्या कामावर ठेवतो. ज्या व्यक्तीने आपल्यासमोर आपल्या आईचा खून केला आहे, त्यासाठी चंदन उगाळताना तिला किती कष्ट होत असतील. तरीही ती तिचे काम नेटकेपणाने करते. कुरुपतेमुळे व शारीरिक व्याधींमुळे, तिच्या आयुष्यात लग्न, मुळेबाळे होण्याचा काहीच संभव नसतो. नगरीतील सर्वजण तिला हसत असतात. चेष्टा करत असतात. तरीही ते तिचे काम प्रामाणिकपणे करत राहते. देवकीच्या प्रत्येक बाळंतपणात, ती महालाबाहेर जाऊन उभी असते. तिथे ती सर्व देवकीपुत्रांचा मृत्यू पाहते. नंतर वसुदेव जेव्हा कृष्णाला घेऊन गोकुळाला जातात, तेव्हादेखील ती तिथेच असते. कृष्णाचे दर्शन घेते. ती कोणालाही याबद्दल काहीही सांगत नाही. कृष्णाच्या या अदलाबदलीबद्दल फक्त याच तीन लोकांना माहिती असते. याद्वारे लेखकाने या तीन पत्रांना एकत्र गुंफलेले आहे.
नंतर पूतना जेव्हा कृष्णाला मारायला जाते, तेव्हा ती मध्ये पडते. पूतनाकडून मारदेखील खाते पण पूतनेला रोखायचा पूर्ण प्रयत्न करते. ती जेव्हा रासलीलासाठी गोकुळात जाते, तेव्हा गोपी तिला हिणवतात. राक्षसीण समजून बेदम चोप देतात. त्यामुळे व्यथित होऊन ती आत्महत्या करायला यमुनेत जाते, तेव्हा कृष्ण फक्त तिच्यासाठी बासरी वादन करतो. नदीपलीकडून फक्त तिलाच कृष्णाच्या बासरीचे स्वर ऐकू येत असतात . त्यानंतर ती पूर्णपणे कृष्णमय होते. स्वतःला सजवू लागते,साज शृंगार करते. सगळे लोक तिची निंदानालस्ती करत असतात, पण ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ती कृष्णातच मग्न होते. मथुरेत आल्यावर कृष्ण तिच्या घरी जातो, तिच्याकडून चंदन लावून घेतो, तेव्हा ती पूर्णमय कृष्णमय झालेली असते. तेव्हाच तिला देह सोडायचा असतो. पण कंसाची हत्या होईपर्यंत ती स्वतःला मृत्यूपासून रोखते. आणि कंसाचा मृत्यू झाला हे ऐकूनच प्राणत्याग करते. आयुष्यभर कबाडकष्ट करून, लोकांची उणीदुणी ऐकूनसुद्धा ती स्वतःला अलिप्त ठेवते. तिला प्रशंसा, पैसा कशाचीच आस नसते. मरण्याआधी काही क्षणच तिला कृष्णाबरोबर व्यतीत करता येतात, पण तेवढ्यातही ती पूर्णपणे कृष्णार्पित होते.
या कादंबरीतील तिन्ही पात्रे ही पूर्णपणे वेगवेगळ्या परिस्थितीत कृष्णांशी संबंध जोडतात. राधिका आई म्हणून, पेंद्या मित्र व गुरु म्हणून, तर कुबजा ही कृष्णाची भक्त व रक्षक म्हणून. यांनी कृष्णाचे खरे रूप ओळखून त्यानुसार ते स्वतःला कृष्णाला अर्पित करतात. हा त्याग, भक्ती, निष्ठा त्यांना संसारपाशातून मुक्त करतात. त्यांचे कृष्णमय झाल्यानंतरचे वर्तन हे गोनिदानी विस्तारपूर्वक सांगितले आहे. साक्षात्कार झाल्यावर माणसात कसा बदल घडतो, तो कसा वेगळाच माणूस बनतो. सर्व चराचरांमध्ये कृष्ण दिसू लागल्यावर, आपण जशी आपली स्वतःची काळजी घेतो, तशीच ते सर्व जगाची, मुक्या प्राण्यांची, अजाण बालकांची, जीवजंतूंची, झाडाफुलांची काळजी घेतात. मनात भक्तीरसाचा झरा सदैव वाहत असतो. जे त्यांच्या सानिध्यात येतात, तेदेखील विस्मयचकीत होतात. स्वतःला संपूर्णपणे समर्पित केल्यानंतर आपण आपले राहातच नाही .सगळे जगच एकच होते. हा अध्यात्मिक अनुभव शब्दबद्ध करताना गोनिदांना खचितच यश आले आहे. हीच त्यांच्या लेखणीची कमाल आहे.
-बेशब्द..
२ जानेवारी २०२६