तुंबाडचे खोत- पुस्तक परीक्षण



पुस्तकाचे नाव: तुंबाडचे खोत भाग एक व दोन
लेखक: श्री ना पेंडसे
वाचन दिनांक: ८-११-२०२५ ते ०५-१२-२०२५
लेख दिनांक: ६-१२-२०२५


तुंबाडचे खोत ही मराठी वाङ्मयातील खूपच उच्च दर्जाची दीर्घ कादंबरी आहे. त्यात तुंबाड नावाच्या गावाचा आणि गावातील खोत परिवाराचा प्रदीर्घ १५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी व्यापलेला आहे. यातील मुख्य कालखंड हा ब्रिटिशकालीन आहे. या ग्रंथाची तुलना मी गॅब्रियल गार्सिया मार्केझ या कोलंबियातील नोबेल पारितोषिक विजेत्याच्या ‘One Hundred Years of Solitude’ या ग्रंथाशीच करू शकतो. त्याच्याशी मिळतीजुळती पण संपूर्णतः मराठी मातीतील ही कथा आहे. यातील खरी मेख ही यांमधील पात्रांमध्ये आहे. एकाच कुटुंबाची शकले होतात व दोन्ही शकले काळानुरूप एकमेकांशी जमवून घेत तर कधी एकमेकांवर कुरघोडी करत कसे त्यांचे आयुष्य जगतात, अशी ही खरे तर पूर्ण कहाणी आहे. साडेतेराशे पानांहून अधिक लांबीच्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तो एकदा हातात घेतला तर सोडवत नाही. पावलापावलांवर अनपेक्षित काहीसे समोर येत जाते. पुढे काय होणार याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य आहे हेही कळते. यातील बऱ्याचशा घटना या शक्यतेच्या पातळीवर आणि त्या काळाशी सुसंगत असल्या तरी आजच्या युगात काहीशा खटकतात. पण त्याकाळची सामाजिक परिस्थिती, वैचारिक बदल, कौटुंबिक एकजूट आणि भांडणे, सामाजिक स्वातंत्र्य चळवळीतील घटना या सगळ्यावर हे पुस्तक एक सापेक्ष नजर टाकते.


सुरुवातीचा कादंबरीचा प्रवास हा तुंबाडपासून होत असला, तरी नंतर चिंचबाड (किंवा लिंबाड) व तालुक्याचे ठिकाण अशी पात्रांची प्रगती सरळ दिसते. यातून गावाकडून शहरीकरणाचा प्रवासदेखील दाखवला आहे. कित्येक पात्रे—ज्यांचा फक्त उल्लेख यात आहे—ती आधी विदर्भ व मुंबई आणि शेवटी अमेरिकेला कशी स्थायिक होतात, हेही सूचकपणे मांडून लेखकाने शहरीकरणाचा प्रवासच उलगडला आहे असे वाटते. शहरीकरणामागे केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक व्यवस्थादेखील कशी कारणीभूत होते, तेही हे पुस्तक वाचताना कळते.


या पुस्तकात खूप व्यक्ती आणि व्यक्तिचित्रे आहेत. असे असूनही लेखकाने सुंदरपणे या व्यक्तींचे स्वभाव आणि परिस्थिती उलगडून सांगितली आहे. यातील काही पात्रे ही खूप महत्त्वाची असून त्यांना हळूहळू मंचावर आणले आहे. यात बऱ्याचदा भूतकाळाचा आढावा घेतला आहे व आत्ताची स्थिती ही त्यापासून कशी बदलत गेली आहे ते सांगितले आहे. अनेक पात्रे वेळेनुसार कशी बदलत जातात, त्यांच्यात कसा व काय बदल होतो, हे बघणे आणि अभ्यासणे फारच मनोरंजक आहे. अशी पात्रे आपल्या आजूबाजूला आहेत का, हे नकळतच आपण शोधू लागतो. आजच्या परिस्थितीत ही पात्रे कशी वागली असती, असेदेखील आपल्या मनात येते व त्यानुसार आपण आजच्या परिस्थितीकडेसुद्धा वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करतो.


प्रत्येक व्यक्तिचित्र हे विस्तारपूर्वक मांडले आहे. त्यांच्या मनातील विचार व द्वंद्व हे मांडले आहेच, पण निर्णय घेताना ते या भावनांच्या आहारी जातात असे फारसे वाटत नाही. स्वतःच्या भावना दाबून प्रसंगी समाजाच्या दडपणाला बळी पडणे, समाजाचा खूप विचार करताना ही पात्रे दिसतात. तसेच नंतरच्या काळात सामाजिक रूढी झुगारून ही पात्रे स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला लागतात. हा बदल लेखकाने खूप खुबीने दाखवला आहे.


यातील सगळीच पात्रे चांगली व वाईट यांच्यामध्ये कुठेतरी रेंगाळणारी आहेत. मानवी स्वभावाच्या सर्व छटांची माणसे यात रेखाटलेली आहेत. नंतरच्या काळात या पात्रांमधील द्वंद्व समर्थपणे दाखवले आहे. यात 'चांगल्याची वाईटावर मात' असे पुस्तकी आदर्शवादी काही नसून, सगळेच व्यावहारिक आणि जंगलच्या कायद्याने चालते. यात शूर व कर्तबगार माणसांसारखीच अनेक पात्रे ही लाचार आणि बेधडकसुद्धा दाखवली आहेत. या लोकांची अनेक संभाषणे यात वर्णिलेली आहेत व त्याद्वारे कथा पुढे सरकवली आहे. ही लोकं सर्वसामान्य समाजाचे प्रतीक आहेत; त्यांच्या आत्मसंतुष्ट व आत्मकेंद्री वृत्तीचे यात यथार्थ दर्शन घडवले आहे. काही प्रसंगांत हाच समाज असा वाहवत जातो की, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मागे स्वतःची विवेकबुद्धी बाजूला सारून मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे कसा वागतो, हेही खूप खुबीने मांडले आहे. समाजाचा शहाणपणा हा त्यावेळच्या नेत्यांवर कसा अवलंबून असतो आणि त्यांच्या गुण-दोषांचा समाजावर किती खोलवर ठसा उमटतो, हेदेखील यात उलगडले आहे.


यातील स्त्रीपात्रे हासुद्धा एक अजबच विषय आहे. आधी समाजाच्या जोखडाखाली अडकलेली स्त्री ही नंतर कशी स्वतंत्र आणि स्वमनाची होत जाते, हे यात दिसते. पूर्वी स्त्रीवर अत्याचार कसा केला जायचा व नंतर असाच काहीसा अनाचार स्त्रीने स्वतःच कसा सुरू केला, याचेही वर्णन सुबकपणे केले आहे. हा अवघड विषय कुठेही तोल न जाऊ देता लेखकाने सूचकपणे मांडला आहे.


या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लोकांचे मृत्यू किंवा एकदमच नाहीसे होणे! अगदी भुतांमुळे होणाऱ्या मृत्यूपासून ते इंग्रजांच्या हाती झालेल्या बलिदानापर्यंत आणि काही परस्परांतील भांडणातील खुनांचासुद्धा यात समावेश आहे. यातल्या काही पात्रांबरोबर आपले असे संबंध जोडले जातात की, ती पात्रे मेली तेव्हा 'बरे झाले' असे वाटते, तर काही पात्रे मेली की दुःख होते; असा हा सगळ्यांचाच अजब कारभार! काळ पुढे सरत असतो, आपली माणसे तो हिरावून घेतो, पण लेखकाने हे फारच चातुर्याने वापरले आहे. काही मृत्यू हे साग्रसंगीत अत्यंत सविस्तरपणे सांगितले आहेत, तर काही मृत्यू हे इतके झटकन होतात की, खात्री करण्यासाठी ते वाक्य परत वाचावे लागते. धक्कातंत्राचा खूपच चांगला उपयोग यात लेखकाने केला आहे.


याचा शेवट तर अंगावर काटा आणतो! जेव्हा आपण अगदी शेवटचे वाक्य वाचतो, तेव्हा डोळे मोठे होतात; एक अनपेक्षित असा धक्काच तिथे दिलेला आहे. पूर्ण कादंबरीत वेळोवेळी असे अनेक धक्के दिले असले, तरी या शेवटच्या गुपिताचे उलगडणे आधी सुचणे जवळपास अशक्यच आहे. यातील काही पात्रांचा वर्तमान किंवा शेवट हा अवघ्या एक-दोन वाक्यांमध्येच गुंडाळला आहे, त्याद्वारे ही कादंबरी बांधीव आणि आखीव-रेखीव वाटते. महत्त्वाच्या ठिकाणी खूप सविस्तर वर्णन केले असले, तरी परिघाबाहेरील बाबी या कटाक्षाने थोडक्यात उरकल्या आहेत; अन्यथा ही कादंबरी अजून खूप मोठी होऊ शकली असती. ही भूतकाळात घडलेल्या गोष्टींची कादंबरी असली, तरी तिची सुरुवात आणि शेवट हा वर्तमानाशी जोडलेला आहे.


यातील अनेक महापुरुषांचेसुद्धा उचित वर्णन आले आहे. टिळक, गांधी, सावरकरांबरोबरच साने गुरुजी यांच्या कामाबद्दलसुद्धा खूप विस्ताराने वर्णन केलेले आहे. मला साने गुरुजी फक्त 'श्यामची आई'मुळे आणि तेवढेच माहिती होते, पण त्यांची पुण्याई जगाला दाखवण्याचे कामसुद्धा या कादंबरीने चांगल्या पद्धतीने केले आहे. यात लेखकाचा गांधीद्वेष प्रकर्षाने जाणवतो. गांधीहत्येनंतरचे ब्राह्मणांवरील हल्ले या एका झाकलेल्या पर्वाचा पुनरुच्चारसुद्धा या कादंबरीत केला आहे. सावरकरप्रेमींची झालेली वाताहतसुद्धा याद्वारे दाखवली आहे. टिळकांना विसरून लोक गांधींच्या मागे कसे गेले, याचेही प्रकटन यात केले आहे. एकूणच मराठी वाङ्मयातील हे एक अनोखे पान आहे आणि मराठी साहित्यात या कादंबरीद्वारे श्री. ना. पेंडसे हे अजरामरच झालेले आहेत.


-बेशब्द..
०६ डिसेंबर २०२५