आदर्शवाद-मनोगत



कालच मी ओशोंचे 'गोरखवाणी' हे पुस्तक संपवले. यात ओशोंनी गोरखनाथांवर दिलेल्या वीस प्रवचनांचे मराठी भाषांतर आहे. यातील एका प्रश्नामुळे माझ्या विचारांची दिशाच बदलली आणि त्यावरच हे मनोगत आहे. हा प्रश्न आदर्शांवर आधारित आहे. ओशोंचे म्हणणे आहे की, आदर्शांमुळे माणूस पाखंडी बनतो, अनैसर्गिक होतो. त्याच्या जीवनातील सहजता निघून जाते. अति-आदर्श हे पाळले जात नाहीत. मग माणूस पळवाटा काढतो आणि मुखवटे घालून जगतो. त्यामुळे तुमचे आदर्श हे तुमच्या नैसर्गिक जीवनाशी आणि बाह्य जीवनातील सहजज्ञानाशी सुसंगत असले पाहिजेत. उगाच उत्तुंग, अव्यावहारिक आदर्श ठेवता कामा नयेत. त्यापेक्षा वास्तववादीपणा हेच ओशोंचे मुख्य सूत्र आहे. आदर्शांमुळे प्रेमात अडथळा येतो, आदर्शांमुळे अहंकार वाढीस लागतो आणि तो परमेश्वराच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा बनतो.


वेगवेगळे धर्मग्रंथ वाचून, त्यातील कालबाह्य तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न लोक करत असतात. अशा पद्धतीने लोक भूतकाळातच रमतात आणि वर्तमानाकडे, आजच्या जागतिक परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आदर्शांचे हे ओझे स्वतःवर लादल्यामुळे ते वस्तुस्थितीचा स्वीकार करत नाहीत. हेसुद्धा एक आभासी विश्वच आहे, ज्यात अशी आदर्शवादी खुळी मंडळी एकमेकांना धर्मग्रंथांद्वारे आदर्शांच्या चुकीच्या संकल्पना सांगून स्वतःला त्यात अडकवून ठेवतात. हा भ्रम त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचू देत नाही, किंबहुना त्यातून बाहेर पडायची इच्छा आणि दिशा उरत नाही. तुम्ही बंधनात आहात, याचा आभासदेखील तुम्हाला होत नाही. यामुळे ते परमेश्वराने दिलेले हे सुंदर जीवन मनसोक्त उपभोगू शकत नाहीत. ते स्वतःला कुठेतरी अडकवून ठेवतात आणि वेगवेगळे मुखवटे परिधान करतात. हे मुखवटे लावण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा हा आदर्शवाद आणि त्यासाठी केलेला अट्टाहास, त्यांचा वृथा अहंकारच असतो. 'मी आदर्शवादी आहे, त्यामुळे बाकीच्यांपेक्षा मी वरचढ आहे', असे काहीसे मत बनते. हा अहंकार नेमका कुठे दडला आहे, याची जाणीवसुद्धा होत नाही. आदर्शवादाचे दुष्परिणाम दिसत असूनही, इतर काही कारणे देऊन लोक आपल्या अहंकाराचे जतन आणि रक्षण करत असतात. कदाचित अहंकाराचा मूळ पाया हा 'आदर्शवाद' असू शकेल.


'आदर्शवाद चांगलाच असतो' अशा अवास्तव कल्पनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. काळानुसार आदर्शांत बदल केला पाहिजे हे लोकांना पटतच नाही, हा अहंकाराचाच एक भाग असतो. जर आदर्शांत आणि वास्तवात खूप अंतर असेल, तर ते घातक ठरू शकते. असें आदर्श तुम्हाला जीवनातील खड्ड्यांपासून वाचवत नाही; उलट अशा खड्ड्यात पडल्यानंतर आणि आपली चूक उमगल्यानंतरही, तुम्ही 'कसे चांगले आणि आदर्श आहात', अशा अहंकाराच्या भ्रमात तुम्हाला अडकवून ठेवते. या आदर्शवादाचा सर्वात मोठा दुष्परिणाम असा आहे की, लोक आदर्शांच्या नावाखाली त्यांच्या मानसिक दौर्बल्याचे देखील समर्थन करत आहेत.


कोणताही प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी नेहमीच तो प्रश्न समजून घेणे, तो जसा आहे तसा मांडणे आणि स्वीकारणे अशी असते. जे आहे ते तसेच बघणे, त्यानुसार सहजपणे व सापेक्षपणे निर्णय घेणे, घटनांमागचा कार्यकारणभाव समजून घेणे व त्यानुसार आदर्शांना वास्तवात आणून वास्तववादी बनणे हे गरजेचे आहे. भूतकाळाचा व भविष्याचा अतिविचार न करता, येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेत आणि प्रसंगी लढून आपले कर्तव्य करावे लागते.


कुठेतरी या आदर्शांच्या मगरमिठीतून सुटून आयुष्याकडे वास्तववादी व क्षणभंगुर पद्धतीने पाहिले पाहिजे आणि या आयुष्याचा खरा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या नीतिमत्तेच्या होकायंत्राला (Moral Compass) आदर्शवादी चुंबकाच्या जाळ्यात फसवून ठेवलेले असू शकते; असे आदर्शवादी चुंबक दूर करूनच खऱ्या जीवनात वास्तववादी होता येईल आणि व्यावहारिक जीवन आनंदाने जगता येईल. मानवासाठी हेच एक खरे आणि आचरणात आणण्याजोगे कर्तव्य आहे.


हे काही एका दिवसात होणारे काम नाही; प्रत्येक निर्णयाचे सजगतेने निरीक्षण करून, त्यामागची वेगवेगळी आवरणे बाजूला करून त्यातील सत्याला भिडायला लागते. ते सत्य बहुधा कठोर आणि एकच असणार आहे; कारण ते सत्य आहे, आभास नाही. या आभासी विश्वापासून सुटका केवळ 'साक्षीभावानेच' होऊ शकते. प्रत्येक निर्णयाची चिकित्सा करणे हेसुद्धा साक्षीभावाचेच एक रूप आहे. त्यासाठी समाधी किंवा विपश्यनेची (विपश्यना केंद्रात जाण्याची) गरज नाही; कदाचित विपश्यनेचा हा असा सहज अर्थ असू शकेल. हेच कदाचित खरे ध्यान असू शकेल.


-बेशब्द..
२१ जानेवारी २०२६