आश्रम पुरुषार्थ योग व तत्व

भारतीय तत्त्वज्ञानामध्ये चार या आकड्याला विशेष महत्त्व आहे, असे मला जाणवले आहे. चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. चार आश्रम- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. चार मोक्षप्राप्तीचे मार्ग (त्यांना श्रीकृष्ण गीतेत योग असे म्हणतो) ते म्हणजे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग व ध्यानमार्ग किंवा वैराग्यमार्ग. तसेच, ज्योतिषातील चार तत्व- अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. हे सर्व क्रमशः हे सर्व एकमेकांशी निगडितच आहे. याबद्दलच हा लेख आहे.


आयुष्यातील पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. याचा शब्दशः अर्थ म्हणजे ब्रह्मासारखे आचरण करणे. हे शक्यतो वयाच्या 25 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. या कालावधीत वेगवेगळ्या कला, विद्या, शास्त्र, धर्म ज्ञान यांचे अध्ययन, हेच मुख्य कर्म योजले आहे. याद्वारे भौतिक व पारलौकिक आयुष्यासाठीची तयारी, या काळात तयार करणे अपेक्षित असते. काही सुज्ञ लोक, या काळात ज्ञानमार्गाचे पालन करतात व आपले संपूर्ण आयुष्य या मार्गानेच व्यतीत करून, मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करतात. बाकी बहुतेक लोक यातून पुढच्या टप्प्यावर जातात. या काळात अनेक श्रम करून, स्वतःला तापवून, खडतर असे प्रशिक्षण घ्यायचे असते.याकाळात शरीरात ऊर्जा देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हा अग्नी तत्वाशी निगडित कालखंड आहे असे मला वाटते. या काळात सतत ज्ञानयज्ञ चालू असतो, ज्यात आपल्या कष्टाच्या समिधा टाकून, ज्ञानरूपी पुरस्कार मिळवायचा प्रयत्न असतो. प्रत्येकाच्या प्रकृतीधर्मानुसार, त्याच्या कष्टानुसार व आधीच्या जन्मांच्या पुण्यनुसार त्याला त्याचा परतावा मिळत असतो.


दुसरा आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम. याचा शब्दशः अर्थ म्हणजे गृहमध्ये स्थित होणे, म्हणजे घरामध्ये राहणे. हा आश्रम वयाच्या 25 ते 50 वर्ष या काळात सांगितला आहे. या काळात विवाह, संतान या संस्कृतीच्या जतनासाठी आवश्यक गोष्टी करावयाच्या असतात. यात सर्व कुटुंबाचे पालनपोषण व त्यासाठी आवश्यक ते अर्थाजन करणे अपेक्षित असते. यात कर्माचे सर्वात अधिक महत्त्व आहे. ही सर्व जीवनावश्यक कर्मे, अकर्मिक पद्धतीने, म्हणजेच फळाची अपेक्षा न धरता करणे अपेक्षित आहे. हा आपल्या संस्कृतीचा कणाच आहे, कारण इतर तिन्ही आश्रमातील लोक यांच्यावर अवलंबून असतात. या काळात, गृहस्थ हा आपल्या वडीलधाऱ्या मंडळींची व पुत्रपौत्रादिकांची जबाबदारी घेत असतो. गृहस्थाच्या अशा जबाबदारी घेतल्यामुळेच संस्कृती टिकून असते. त्यानुसार हा पृथ्वी तत्वासारखा असतो, ज्यावर संपूर्ण विश्व टिकून आहे. हा सर्व कष्ट झेलून, शांतपणे, सोशिकपणे कर्म करतो. बहुतेक लोक हा आश्रम अनुभवतात, पण खूपच कमी लोक निष्काम भावनेने आपले कर्म करू शकतात.


तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. याचा शब्दशः अर्थ की, वनाकडे प्रस्थान करण्याचा आश्रम. हा कालखंड म्हणजे वयाच्या 50 ते 75 वर्ष असतो. या काळात शरीर थकलेले असते, पण अनुभवाचा मोठा साठा माणसाकडे तयार झालेला असतो. या काळात, आयुष्यात मिळवलेले सर्व ज्ञान, आपल्या पुढच्या पिढीला सुपूर्त करण्याचा हा काळ असतो. मार्गदर्शनाचा असतो. वयोमानामुळे स्वतः काम करणे अवघड झालेले असते. अशा वेळेस आपला सर्व प्रपंच हळूहळू पुढच्या पिढीकडे देऊन, आपण वैराग्याच्या, संन्यासाच्या वाटेकडे हळूहळू रोख वळवायचा असतो. प्रपंचातून लक्ष दूर करायचे असते. या काळात माणूस गोष्टी सोडायला शिकतो. मनातील कामना या काळापर्यंत पूर्ण झालेल्या असतात किंवा त्यांना पूर्ण करणे शक्य नाही, हे त्याला पटलेले असते. काम या पुरुषार्थापासून विभक्त होण्याची ही वेळ असते. ह्या काळात तो काही पूर्ण न झालेल्या इच्छा, आवडीनिवडी, छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतःवरच्या जबाबदाऱ्यांचे ओझे कमी कमी होत गेल्याने, माणूस हा हलका हवेसारखा व्हायला लागतो. तो अबालवृद्ध सर्वांशी संवाद ठेवून असतो. म्हणून तो वायु तत्व सारखा असतो. हळूहळू अनेक गोष्टींकडे विभागलेले त्याचे लक्ष, आता कमी कमी होत एकाच गोष्टीकडे, देवाकडे, परमेश्वराकडे केंद्रित व्हायला लागते. तो देवाची भक्ती करायला लागतो, समर्पण करायला लागतो. कधी समवयस्क लोकांना एकत्र घेऊन, तर कधी एकांतात तो आपले भक्तीकार्य करत असतो. तिथूनच तो भक्तिमार्गाचे पालन करायला लागतो.


त्यानंतर शेवटचा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. याचा अर्थ म्हणजे सतचा नाश, स्वचा नाश. याचा कालावधी हा वय वर्षे 75 ते पुढे असा सांगितला आहे. वानप्रस्थांमध्ये जवळपास सर्व गोष्टींशी नाते तोडून, देवावर भक्ती जडलेली असते. या काळात, तो त्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. सर्व बंधने, जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. तो सुद्धा सगळ्यातून मुक्त, मोकळा, अनिर्बंध झालेला असतो. तो पाण्यासारखा जशी वाट मिळेल तसे जात असतो. मनाला वाटेल तसे वागत असतो. तिन्ही आश्रमात केलेली कर्मे, अर्जित केलेले ज्ञान व जीव तोडून केलेली भक्ती, याचे फळ याचे शिखर, तो याच काळात गाठतो. कोणत्याही गोष्टीची आस, अपेक्षा, इच्छा नसल्यामुळे, तो प्रवाही असतो. त्याने सर्वच गोष्टी अनुभवल्या असल्याने, तो कशातही न अडकता पुढे जात असतो. त्याचे देहभान देखील नाहीसे झालेले असते. त्याने सर्व गोष्टींशी फारकत, मोक्ष घेतलेला असतो. त्याला खरोखरचे वैराग्य प्राप्त झाले असते. सर्व आत्मांची एकच इच्छा असते, ती म्हणजे परमात्माशी मीलन. ती पूर्ण करण्यासाठी तो सर्व प्रयत्न करतो.


आपल्या तत्त्वज्ञानात जरी असे चार आश्रम व चार पुरुषार्थ सांगितले असले, तरी सर्वजण त्यानुसारच आचरण करत नाही. नियतीच्या, पूर्वपुण्याच्या प्रभावामुळे काहीजणे एकाच आश्रमात, एकाच मार्गाला लवकर लागतात, काहीजण नंतर प्रवास सुरू करतात, तर काहीजण कधीही प्रवास सुरू देखील करत नाहीत. काही तर असेही असतात, जे प्रत्येक मार्गाचा अनुभव घेतात. स्वतःला कोणता मार्ग योग्य आहे, याची पडताळणी करतात. हे अवलीये, प्रत्येक मार्गात पूर्णपणे झोकून देऊन प्रयत्न करतात. पुरेशा प्रयत्नानंतर, अनेक प्रयोग केल्यानंतर, त्यांना हे उमगते की, हा मार्ग माझा नाही, माझ्यासाठी नाही. मग ते दुसरा मार्ग चोखळतात. कधी ना कधी, संपूर्ण शक्तीने, एकाग्रमनाने प्रयत्न केल्यानंतर, त्यांना सुयोग्य रुचेल असा मार्ग त्यांना सापडतो. मग ते त्या मार्गावरून मार्गक्रमणाने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करतात.


-बेशब्द..
१६ जुलै २०२६