जीवनाचे महत्त्वाचे पैलू

आत्तापर्यंतच्या आयुष्यात घेतलेल्या ज्ञानाद्वारे, मी माझ्या आयुष्याला सात पैलूमध्ये वर्गीकृत केले आहे. ही सात आयुष्याची महत्त्वाचे भाग असून, यामध्ये समतोल राखणे खूप गरजेचे आहे. या सात पैलूंतील असमतोलामुळेच आयुष्यात अनेक प्रश्नांचा जन्म होतो, असे मला वाटते. यालाच मी मध्यम मार्ग असे संबोधतो. या ७ पैलूमध्ये समतोल साधूनच, आनंदी जीवन जगता येते, असे माझे मत आहे.


१) सुदृढ शरीर: शरीर आत्म्याचे मूळ स्थान आहे. शरीराद्वारेच आपण सर्व सुखदुःखे भोगू शकतो. म्हणूनच याकडे दुर्लक्ष करणे हा अक्षम्य गुन्हाच आहे. शरीर हे आपल्याला वेगवेगळी संकेत देत असतात, ज्यावरून आपल्याला कळते की आपले जीवन हे योग्य पदावर आहे किंवा नाही. त्यामुळे दररोज दिवसातील किमान दोन तास, सक्रियपणे शरीराला देणे अपेक्षित आहे. यामध्ये दररोजचा व्यायाम करणे, योग्य खाद्यपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. याचबरोबर अधूनमधून उपवासाद्वारे पचनशक्तीला आराम देणे हेही गरजेचे आहे. झोप ही तर अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमध्ये शरीराची डागडुजी होत असते . या मूलभूत उपायांनी शरीर तंदुरुस्त राहते व दीर्घकाळापर्यंत, रोगराईशिवाय साथ देऊ शकते.


२) आर्थिक स्थिती: जीवनात आर्थिक स्थैर्य गरजेचे आहे. स्वतःच्या मूलभूत गरजा, आर्थिक नियोजनाद्वारे पूर्ण करणे अत्यावश्यकच आहे. याद्वारे अनेक चिंतांपासून मनाचे संरक्षण होऊ शकते. भविष्याची काळजी राहत नाही. गरज आणि हाव यातील फरक नीट समजून घेतला पाहिजे. दुसऱ्यांशी तुलना करण्यात काहीही हशील नाही. पैसा हा वस्तू देऊ शकतो, समाधान नाही. त्यामुळे पैशाच्या मागे अंधाधुंदपणे न पळता, आयुष्यातील इतर पैलूंना पुरेसा वेळ देता यायला पाहिजे. यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे.


३) कौटुंबिक स्वास्थ्य: हा तिसरा महत्त्वपूर्ण पैलू आहे. यात स्वतःच्या कुटुंबातील लोकांना पुरेसा वेळ देणे, त्यांच्याशी चांगले संबंध राखणे अपेक्षित आहे. बऱ्याचदा आपण, आपल्या जवळच्या व्यक्तींना गृहीत धरतो. त्यांच्या आशा -अपेक्षांकडे दुर्लक्ष करतो. कुटुंब हा स्वतःचाच विस्तारलेला भाग असतो. त्यामुळे त्याच्याशी सतत संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, हे याच्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असते. कुटुंबाच्या मदतीनेच आपण आयुष्यातील आपल्या स्वप्नांची पूर्तता करू शकतो.


४) सामाजिक सलोखा: माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याचा दररोज कुटुंबा- बाहेरील व्यक्तींबरोबर संबंध येतच असतो. हा संबंध सलोख्याचा, तंटाविरहित असले पाहिजे. विचारांमध्ये, आचारांमध्ये मतभेद असणारच आहेत, पण त्याचा परिणाम परस्परातील नातेसंबंधावर होऊ न देणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. समाजाशी पूर्णपणे फारकत घेणे चुकीचे आहेच, पण पूर्णवेळ सामाजिक कार्यात समाजातच राहणेदेखील चुकीचे आहे. यात योग्य तो समतोल साधलाच पाहिजे.


५) बौद्धिक प्रगती: स्वतःच्या उन्नतीसाठी हा एक अत्यंत गरजेचा पैलू आहे. दररोज काही वाचन करून, दुसऱ्यांशी चर्चा करून, चांगले ज्ञानवर्धक videos बघून, आपल्या ज्ञानात भर टाकली पाहिजे. अन्यथा, आपण विहिरीतील बेडकाप्रमाणे बनतो, जो विहिरीलाच आपले सर्व विश्व समजत असतो. स्वतःच्या संकल्पनाविरुद्ध विचार हेदेखील समजून घेऊन, त्याद्वारे आपले विचार सतत सुधारत राहणे अपेक्षित आहे. जग नेहमीच झपाट्याने बदलत असते. हा बदल ओळखून, आपले ज्ञान अद्ययावत करत राहिले पाहिजे.


६) मानसिक स्वास्थ्य: हे सर्व व्याधींचे मूळ मानले गेले आहे. कोणतीही गोष्ट, आधी मनात जन्म घेते व नंतर ती गोष्ट भौतिक जगात येते. आजकालच्या धकाधकीच्या युगात, या पैलूचे महत्त्व अजूनच वाढले आहे. आपण मनाकडे दुर्लक्ष करून, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीमागे, आपला वेळ वाया घालवत आहोत. आपले मन आपल्याला काय सांगत आहे, याकडे आपण साफ दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळेच, सदैव बेचैन मनस्थिती असते. दिवसभरातील काही वेळ, शांतपणे बसून मनाचे ऐकले पाहिजे. ते काय म्हणत आहे हे ऐकून घेऊन, त्याचे प्रश्न, भीती यांचे समाधान केले पाहिजे. यायोगे, भावनेच्या भरात आपल्याकडून काही अनुचित कृत्य होणार नाही.


७) अध्यात्मिक प्रगती: हा सर्वात महत्त्वाचा पैलू असूनही याकडे सहसा आपल्या सर्वांचे दुर्लक्षच होते. यात संन्यास घेणे, सर्वकाही सोडून देणे अपेक्षित नाही. यात स्वतःला ओळखून घेऊन, स्वतःची तत्वे ठरवणे व त्यानुसार वागणे अपेक्षित आहे. याला फारसा वेळ देखील लागत नाही. स्वतःची तत्वे स्पष्ट असतील व त्यानुसार तुमचे आचरण असेल, तर तुमची अंतप्रेरणा सुदृढ होत जाते. ती तुम्हाला गरजेच्या वेळी योग्य ते मार्गदर्शन करते. चुकीच्या वाटेवर जाण्यापासून अडवते. खरा आनंद कशात आहे ते सांगते. प्रत्येकाची आत्मा त्याला योग्यच वाट दाखवत असते. याच्याकडे दुर्लक्ष केल्यास, आयुष्यात पुढे केव्हातरी, खूप पश्चाताप होऊ शकतो.


वरील दिलेले पैलू , हे सर्वांसाठी असले तरी वयानुसार याच्यात फरक पडतो. उदाहरणार्थ, लहानपणी आपल्याला आर्थिक बाबी एवढा महत्वाच्या नसतात. नवजात शिशूंच्या पालकांना पूर्ण लक्ष हे पाल्यावरच असते. असे काही अपवाद वगळता, बहुतेक सर्वांसाठी हे मार्गदर्शक ठरू शकते. या सर्व पैलूंचा आढावा दररोज रात्री झोपण्यापूर्वी घेणे हे योग्य ठरू शकते. ह्यायोगे, आपल्या कृतीमध्ये आवश्यक तो बदल करावा. तसेच, आठवड्यातून एकदा मुद्दाम वेळ काढून खोलात जावे. ह्याद्वारे योग्य पद्धतीने समतोल साधता येईल.


-बेशब्द..
२५ जुलै २०२६