वैराग्य..
भारतीय परंपरेत मोक्ष प्राप्तीच्या मार्गांपैकी शेवटचा मार्ग म्हणजे संन्यासयोग, वैराग्ययोग किंवा ध्यानयोग. हा योग शक्यतो संन्यासाश्रमात करावा असे मानले आहे. इथे मला वैराग्य या शब्दाने अत्यंत आकर्षिले, विचार करायला उद्युक्त केले. वैराग्य या शब्दाची फोड ही, वि + आरोग्य, अशी करता येईल का, असा मी विचार केला. पण त्याचे “व्यारोग्य “ असे संधी होते. पण तरीही “वि + आरोग्य”, हे मला काहीसे वैराग्याच्या संदर्भात योग्यच वाटते. “वि” हा प्रत्यय नेहमी विशेष गोष्टी दर्शवण्यासाठी केला जातो, जसे विनायक, विजय. या दृष्टीने विचार करता, वैराग्य याचा अर्थ “विशेष आरोग्य” असे होऊ शकते. बहुदा असे असू शकेल की, आरोग्यामध्ये शारीरिक व्याधी व मानसिक रोग यांच्याबद्दल विचार केलेला आहे. पण विशेष आरोग्यामध्ये या सर्वांबरोबरच आध्यात्मिकदृष्ट्यादेखील सुदृढ, सशक्त होणे, याबद्दल विचार केला असेल. अशा सर्व आरोग्याने जो सुदृढ असेल तोच खरा वैरागी असेल, असे मला वाटते.
संन्यासाश्रम हा इतर आश्रमांपेक्षा वेगळा आहे. बाकी आश्रमात तुम्हाला काहीतरी कर्मे करावीच लागतात. ज्ञानयोगात ज्ञानप्राप्तीचे, कर्मयोगात अकार्मिक कर्माचे, तर भक्तीयोगात तुमच्या अहंकाराचे निर्मूलन करावे लागते. संन्यासाश्रमात मात्र पूर्णपणे वेगळा आहे. यात वैराग्य करावयास सांगितले आहे. वैराग्य पूर्णपणे कर्मविरहित असते. भारतीय परंपरेत वैराग्याचा कर्मविरहित असा अर्थ, कालांतरानंतर खूपच वेगळा आणि चुकीच्या अर्थाने घेतला आहे. वैराग्य म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करून, हिमालयात किंवा गंगाकाठी जाऊन राहणे, भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे, जगापासून फारकत घेऊन कुठेतरी अरण्यात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, गुहेत राहून ध्यान करणे, असा काहीसा अर्थ आता झाला आहे. मूळ धर्मात सांगितलेल्या गोष्टीपासून दूर जाऊन, त्याच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ घेणे, अशा पद्धतीने धर्म भ्रष्ट होणे व मूळच्या धर्म वचनांना विसरून आपल्या अर्धवट ज्ञानाने त्याला बदलणे, हे प्रत्येक धर्मात होतच असते. कदाचित, आत्ता हेच मीदेखील करत आहे.
वैराग्याकडे जाणारा मार्ग हा उलटगणती (countdown) सारखा आहे. आपल्याला ज्या अनेक इच्छा आकांक्षा असतात, त्या हळूहळू पूर्ण होत जातात किंवा आपण त्यातल्या काही सोडून देतो. असे इच्छा, आकांक्षा सोडून देत देतच, शेवटी आपण फक्त मोक्षाच्या आकांक्षेपर्यंत पोहोचतो. बहुतेक या स्थितीलाच वैराग्य म्हणत असतील.
इथे मला संत तुकारामांचे उदाहरण घ्यावेसे वाटते. ते कर्माने वाणी होते. तत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना धर्मशास्त्राचे नसले, तरी अर्थकारणांची व समाजकारणाचे त्यांचे शिक्षण खचितच झाले असणार. त्यानंतर त्यांनी लग्न केले, मुलेबाळे झाली. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन, कर्म म्हणून व्यापार, ते करतच होते. त्यानंतर मात्र ते भक्तीमार्गाला लागले व पांडुरंगाच्या आराधनेत पूर्णपणे रममाण झाले. आयुष्याच्या शेवटी, त्यांना घ्यायला पुष्पक विमान आले होते, असे म्हणतात. तेव्हा ते सर्व प्रपंच मागे सोडून सदेह वैकुंठाला निघून गेले. तुकाराम हे जेव्हा पुष्पक विमानाकडे निघाले, तेव्हा त्यांना खरेच वैराग्य प्राप्त झाले होते. त्यांनी प्रपंचापासून, मीपणापासून संपूर्ण फारकत घेतली होती. तेव्हा ते पूर्णपणे वैरागी झाले होते. त्यांचा भक्तिमार्गापासून वैराग्याचा हा प्रवास कसा झाला, हे समजायला काही साधन नाही. त्यामुळे माझा असा कयास आहे की, भक्तिमार्गाद्वारेच हळूहळू कणाकणाने त्यांचा अहंभाव लोप पाऊ लागला होता. एका क्षणी त्यांना, आजूबाजूची वृक्षवल्ली, प्राणिमात्र हे सुद्धा आपल्यासारखेच वाटू लागले होते, एकच वाटू लागले होते. त्यांच्या अहंप्राणाची त्रिज्या, स्वतःच्या देहापर्यंतच मर्यादित न राहता, वाढत वाढत संपूर्ण विश्वापर्यंत पसरली होती. त्यांना कोणत्याही बाबतीत आपपरभाव असा राहिला नव्हता. सर्व जगच आपले आहे आणि आपण सगळ्या जगाचे आहोत, याचा साक्षात्कार त्यांना झाला होता. सर्व जगाशी त्यांचे प्रेमाचे, आपुलकीचे, आपलेपणाचे, एकात्मतेचे नाते जुळले होते.
या सर्व चिंतनातून मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की, वैराग्याच्या ह्या स्थितीला पोहोचायला, तुम्हाला समाजातून बाहेर पडण्याची गरज नाही. याउलट समाजालाच तुमच्यात सामावून घेण्याची गरज आहे. तुमच्या स्वतःला, खुदी ला एवढे वाढवत नेण्याची गरज आहे की, तिच्या त्रिज्येत, सर्व सजीव व निर्जीव जग समाविष्ट होईल. हे समाजात राहूनच, अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. स्वतःला प्रेमाचा अमर्याद, अथांग वाहणारा स्त्रोत बनवूनच, मनुष्य वैराग्याला पोहोचू शकतो. केवळ मनुष्यांवरच नव्हे तर, सर्व प्रकारच्या जीवसृष्टीवर अमर्याद प्रेम करणे, स्वतःला स्वला हरवून, विसरून जाणे, हेच खरे वैराग्य असेल.
-बेशब्द..
२२ जून २०२६