अवचित कविता..
मृत्यू ही संकल्पना, गूढ होती मला । दररोजच मरताना, दुःख काही होत नाही ।। मरणाची भीती, झाली आता नाहीशी । जिवंतपणी मेलो तरी, वेदना काही संपत नाही ।। जीवनाच्या रगाड्यातून, सुटका होईल अशी कशी । प्राक्तनाचे भोग सगळे, आता काही भोगवत नाही ।। रोज उगवतो सूर्य, मावळण्या संध्याकाळी । रात्र ही विचारांची, सरता म्हणता सरत नाही ।। कविता ही स्फुरली अवचित, तिला जन्मायची नुसती घाई । झरे हे प्रतिभेचे माझ्या, थांबू म्हणता थांबवत नाही ।। प्रेम म्हणजे, कला म्हणजे, असते का असेच काही? । अंतर्मनाच्या डोहाचा, थांग काही लागत नाही ।। -बेशब्द.. ७ ऑक्टोबर २०२४