शब्द आणि सूर

शब्द आणि सूर यांच्यात, झाले एकदा कडक भांडण। सूर मोठे की शब्द मोठे , दोघे बसले यावर आडून ।। शब्द म्हणे मी आहे सुंदर, हलत नाही एकही अक्षर। योग्य जागी, योग्य मजकूर, भावना ह्या जपतो बरोबर।। सूर म्हणे मी आहे सुंदर, मृदू कधी तर कधी कणखर। अबोल प्रश्न बोलके उत्तर, सुप्त भावना करतो जाहीर ।। शब्द म्हणे की सूर चंचल, बेभरवशी बेजबाबदार । सूर म्हणे की शब्द ताठर, भावनाविरहित बेदरकार।। तिकडून आले लय नि ताल, लावली त्यांनी वेगळीच चाल। म्हणे दोघा, होय तुम्ही सुंदर, निवड करणे आहे खडतर।। एक एकटे हो तुम्ही सुंदर, आपापल्या जागी सुखकर। जेव्हा येतो आपण बरोबर, तेव्हा घडते गाणे चपखल।। -बेशब्द.. २४ ऑगस्ट २०२४