विद्या आणि कला

विद्या असते चंद्रासारखे, कलेकलेने ती वाढत जाती। कला आहे उल्का सारखी, झपकन आकाश झगमगती।। विद्या बोलते नीट नेटके, सर्व बाजू योग्य तोलूनी। कला आहे अगदी निवांत, बोले तेच जे असे मनी।। विद्या असते ज्योती सारखी, निरंतर मंद तेवणारी। कला असते ठिणगी सारखी, मनी अग्नि चेतवणारी।। विद्या हे मेंदूचे क्रीडांगण, बौद्धिक कसरती करणारी। कला हे मनाचे उपवन, तरल भावना फुलवणारी।। विद्या येते शिकविता जरी, संयमाची परीक्षा तरी। कला असते उपजत खरी, वेड सर्वां लावते परी।। विद्येला लागते नियमितता, घालते ती स्वतःवर बंधन। कला भटकते दुनियाभरी, तोडून दुसऱ्यांचे नियंत्रण।। कला विद्या ही दोन चाके, ढकलते ह्या जगा पुढे। साथ ही दोघांची लाभते, विश्व नवे अवतरते।। -बेशब्द.. १६ ऑगस्ट २०२४